शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंचा या वेशभूषेतील फोटो शेअर करत केली टीका

0

मुंबई,दि.४: शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतील फोटो शेअर करत टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. राज ठाकरेंनी अनेक मुद्दे मांडले. राज ठाकरेंनी मदरशावर भाष्य केले.

“प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा,” असं राज ठाकरे म्हणाले.

यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. अशातच शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतील फोटो फेसबुकवर शेअर केला करुन सोबत तिखट फेसबुक पोस्टही केली आहे.

राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर जवळपास ५५ मिनिटे भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर टीकेचे आसूड ओढले. हिंदुत्वाच्या अधिक जवळ जाणारी भूमिका घेताना मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्याचा विषय सरकारला मिटवावाच लागेल, अशी भूमिका घेत मनसे स्टाईल इशाराही दिला. पण वाढती महागाई, इंधन दरवाढ, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, यावर एक शब्दही काढला नाही. राज ठाकरेंची हीच गोष्ट अनेकांना खटकली. तशी ती सेना आमदार अंबादास दानवे यांना देखील खटकली आहे. तशा आशयाची त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

फेसबुक पोस्ट

“कोरोना नंतरच्या काळात आज जनतेच्या पोटावर पोटतिडकीने बोलेल आणि त्यानुसार कृती करेल तो खरा लोकनेता…. आज जात, धर्म, प्रांत भेद करण्याची ही वेळ नाही. लोकांची रोजी रोटी हिसकावून घेतली गेली आहे. व्यवसाय बुडाले आहेत. नोकऱ्या जाऊन बेकारी वाढली आहे. महागाईचा आगडोंब भडकला आहे. दिवसेंदिवस दैनंदिन वस्तूच्या वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचा संसार विस्कटला आहे. यावर बोलायचे सोडून धार्मिक अराजक कसे माजेल यावर राज ठाकरे बोलले.”

“शिवतीर्थावर झालेल्या गुडी पाडवा स्नेह संमेलनात स्नेह वाढण्याऐवजी जाती धर्मात द्वेष वाढवण्याचे काम मनसेप्रमुखांनी केले आहे. ह्या त्यांच्या भाषणातून मनसैनिकाना आज काय मिळाले असेल ते केवळ नैराश्य आणि काळजी…!”

“राज ठाकरे यांनी केंद्राच्या लोकशाही विरुद्ध धोरणावर आसूड ओढले असते तर आपल्या कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा कडकडाट झालेला बघायला मिळाला असता पण तसे दिसले नाही. शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रचंड दूरदृष्टी असलेले नेते होते. याची जाणीव आज संबंध महाराष्ट्राला होतेय”.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here