मुंबई,दि.११: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. नवाब मलिकांच्या रडारवर देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या काळात फडणवीस यांनी अंडरवर्ल्डमधील काही लोकांना व कुख्यात गुंडांना खुलेआम संरक्षण दिलं होतं, असा आरोप त्यांनी केला होता. त्याला फडणवीस यांनी जॉर्ज बर्नाड शॉचं वाक्य ट्वीट करून प्रतिक्रिया दिली होती. फडणवीसांच्या या ट्वीटनंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट केलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर दररोज मलिक सकाळी एखादा ‘शेर’ ट्वीट करायचे. नंतर फडणवीस यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली असतानाही मलिक यांनी हीच शेरोशायरी सुरू ठेवली होती. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत मलिक यांनी फडणवीस यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचे काही दाखले दिले. त्याचबरोबर, त्यांनी फडणवीसांवर राजकारणाचं गुन्हेगारीकरण व बनावट नोटांच्या रॅकेटला संरक्षण दिल्याचाही आरोप केला. मलिक यांच्या या आरोपांमुळं खळबळ उडाली होती. फडणवीस त्यावर काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, त्यांनी शॉ यांच्या इंग्रजी ओळी ट्वीट केल्या. ‘फार पूर्वी मी शिकलो होतो, डुकराशी कधीही कुस्ती खेळू नका. त्यामुळं आपल्या अंगावर घाण उडते, याउलट डुकराला मजा येते’, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.
फडणवीस यांच्या या ट्वीटवर संजय राऊत यांनी ‘वात्रटिकाकार’ रामदास फुटाणे यांच्या विडंबनात्मक ओळी ट्वीट केल्या आहेत.
‘चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला… बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला…’ असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी ट्वीट करताना कोणाचाही उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख फडणवीस यांच्याकडंच आहे, हे स्पष्ट आहे.