शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

0

दि.21: विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत तरी यश आलेलं नाही. असं असतानाच आता एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही.

एकनाथ शिंदे हे काल सायंकाळी विधान परिषदेचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जातंय. एकनाथ शिंदेंसोबत 13 आमदारही शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे.

एकनाथ शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे 25 आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.

विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तातडीने दिल्लीला गेल्याचे समजते. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार पडणार का? भाजपा सत्ता स्थापन करणार का? हे लवकरच कळेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here