दि.21: महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असताना, शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे नाराज नेते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. एकनाथ शिंदे भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांचे ट्विट
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
आमदार संजय कुटे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन सूरतमध्ये दाखल
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन भाजप आमदार संजय कुटे सूरतमध्ये दाखल झाले आहेत. पोलिसांनी कुटे यांना मेरिडियन हॉटेलच्या प्रवेशद्वारावर अडवलं होतं. मग फोनाफोनीनंतर त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला.
शरद पवार म्हणाले
महाराष्ट्रात भाजपने यापूर्वीही असा प्रयत्न केला होता. महाविकास आघाडी सरकार बनण्यापूर्वी देखील अशीच बंडाळी झाली होती. अडीच वर्षे सरकारच योग्य चालत असल्याने हे षडयंत्र, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेने भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच सरकार पडलं तर काय यावर शरद पवार म्हणाले की, “आम्ही विरोधी बाकावरही बसू शकतो”