Maharashtra: शिवसेनेकडून सर्व 55 आमदारांना व्हिप जारी; शिवसेना आणि शिंदे गट पुन्हा आमने सामने

0

मुंबई,दि.16: Maharashtra: राज्याच्या विधीमंडळाचे बुधवारपासून अधिवेशन सुरू होणार असून त्या निमित्ताने शिवसेनेतील ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे (Eknath Shinde) गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याचं चित्र आहे. खरी शिवसेना कुणाची? पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. शिवसेनेबाबत सुप्रीम कोर्टात, निवडणूक आयोगाकडे प्रकरण प्रलंबित असताना आता पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आणखी एक खेळी खेळली आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या 55 आमदारांना ठाकरेंनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रतोद सुनील प्रभू यांनी हा व्हिप जारी केला आहे. अधिवेशनाच्या संपूर्ण काळात दररोज कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थिती अनिवार्य असल्याचं या पक्षादेशात म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या या व्हिपनंतर आता शिंदे गट काय भूमिका घेतोय हे पाहावं लागेल.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. शिवसेनेचा पक्ष प्रतोद नेमका कोण याचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. पावसाळी अधिवेशनानिमित्त विविध शासकीय ठराव, प्रस्ताव सभागृहात आणले जाणार आहेत. अशावेळी मतदानाची संभावना असते. तेव्हा विधानसभेतील कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्याबाबत आमदारांना व्हिप जारी केला आहे. एकीकडे विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद नेमले आहे. तर ठाकरे गटाकडून सुनील प्रभू हे मुख्य प्रतोद आहेत.

राज्यातील सत्तासंघर्षावरच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून पुढची सुनावणी ही 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी शिंदे गटाने शिवसेना आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला असून तो वादही आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. सर्वोच्च न्यायालयात एकूण सहा याचिका दाखल असून यामध्ये पक्ष प्रतोद पदाचा वादाचाही विषय आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here