Raj Thackeray Uddhav Thackeray: राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार? शर्मिला ठाकरे यांचे सूचक विधान

0

पुणे,दि.21: Raj Thackeray Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. शिंदे गटानी भाजपा बरोबर राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेले आहेत. राज्यात झालेले सत्तांतरांनर उद्धव ठाकरे एकाकी पडल्याचे दिसते आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा पुन्हा उधाण आलं होतं.

या चर्चांबाबत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सूचक विधान करत नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. शर्मिला ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळेस त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात चर्चेचा प्रश्न म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र कधी येतील? राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यापासून राज्यभरातील जनतेची ठाकरे बंधुंनी एकत्र यावं, अशी भावना आहे.

विशेषत: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांची अशी भावना आहे. पण हा निर्णय दोन्ही भाऊ आणि महाराष्ट्रातील दोन पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. तो निर्णय तेच घेऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड विचित्र घडामोडी घडल्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणत काहीही होऊ शकतं, याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या जनतेला आला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, अशी जनतेची भावना आहे. याच विषयी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केलं. पुण्यात मनसेच्या “गणपती आमचा किंमत तुमची 2022” या आयेजित उपक्रमाचे त्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यालाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.

उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर फायदाच होईल, असं विधान शर्मिला ठाकरे यांनी केलं. त्यांची साद आली तर पाहू. पण त्यांची साद आधी येऊ द्या, असं देखील शर्मिला ठाकरे म्हणाल्या. शर्मिला ठाकरे यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करुन ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्रित करण्यास प्रयत्न केलाय, असं म्हणालया वावगं ठरणार नाही. पण त्यावर आता उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

शर्मिला ठाकरे यांच्या राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्राचे दोन बडे नेते असलेले भाऊ एकत्रित आले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळे भूकंप येईल, असं म्हटलं तर तेही वावगं ठरणार नाही. कारण राज ठाकरे यांचा तरुणाईत खूप मोठा चाहता वर्ग आहे. तर उद्धव ठाकरे यांची राज्याचा कुटुंबप्रमुख, साधा माणूस अशी छबी सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here