नागपूर,दि.१०: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी खळबळजनक दावा केला आहे. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप अनेकदा विरोधकांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांनी तर राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. परत एकदा बॅलेट पेपवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली होती. (Sharad Pawar’s Sensational Claim)
नुकतेच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाने संगनमत करून हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी दिल्लीत दोन व्यक्ती आपल्याकडे आल्या होत्या. त्यांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती, असा गौप्यस्फोट केला.

काय आहे शरद पवार यांचा खळबळजनक दावा? Sharad Pawar’s Sensational Claim
शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दोन लोक दिल्लीत माझ्याकडे आले होते. त्या दोन जणांची नावे व पत्ते आता माझ्याकडे नाहीत. त्यांनी मला सांगितले, महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा आहेत. आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो; पण त्यावेळी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती. असे लोक भेटतच असतात. त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली. त्या लोकांनी आपले म्हणणे त्यांच्यापुढे मांडले. त्यावेळी या कामात आपण भाग घेऊ नये. हा आपला रस्ता नाही. आपण जनतेच्या दरबारात जाऊ, अशी भूमिका आम्ही घेतली, असे शरद पवार म्हणाले.
नागपूर येथून राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा पुढील 40 दिवस राज्यातील विविध भागांतून जाणार आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत मतचोरीच्या मुद्दय़ावर राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. तसेच निवडणुकीत होणाऱ्या हेराफेरीबाबत मोठा दावा केला.