नवाब मलिक यांच्याबाबत शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

0

पुणे,दि.२२: मुंबईतल्या गोवावाला कम्पाऊंडला हडप करण्यासाठी नवाब मलिक (Nawab Malik) यांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात ईडीनं (ED) दाखल केलेल्या आरोपपत्राची मुंबई सत्र न्यायालयानं दखल घेतली. यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या याच मताचा आधार घेत मलिक आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. आता यावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. ते शनिवारी (२१ मे) पुण्यात ब्राह्मण संघटनांसोबतच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “न्यायालयाने नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिमबाबत जे सांगितलं ते मत आहे, तो न्यायालयाचा निकाल नाही. न्यायालयाचा यावर अंतिम निर्णय येईल तेव्हा आम्ही त्यावर बोलू. मी अनेक वर्षे नवाब मलिक यांना ओळखतो. मला खात्री आहे की त्यांचा दाऊदशी कोणताही संबंध नाही. माझ्या मनात त्यांच्या कटिबद्धतेबद्दल अजिबात शंका नाही. त्यांचा चुकीच्या लोकांसोबत संबंध आहे यावर माझा यत्किंचितही विश्वास नाही.”

अनेकदा आरोप झाले

“असे आरोप केले जातात. त्याचं एकच उदाहरण सांगतो आणि हे उदाहरण म्हणजे शरद पवार आहे. माझ्यावरही अनेकदा असेच आरोप झाले होते. काही लोकांनी तशी अनेकदा टीका-टिपण्णी केली होती. शेवटी ज्यांनी आरोप केले होते त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी विधीमंडळात भाषण करून सांगितलं की आम्ही जी टीका केली त्यात काही तथ्य नाही. आम्ही विरोधासाठी विरोध म्हणून बोलत होतो,”

“माझी खात्री आहे की जेव्हा सर्व चित्र समोर येईल त्यावेळी नवाब मलिक यांची स्थिती स्पष्ट होईल,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here