बारामती,दि.19: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. केंद्र (भाजपा) सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना केली. भाजपाला लोकसभा निवडणुकीत याचा फायदा होऊ शकतो अशी चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपात आता शरद पवारांनीराम मंदिरात सीतेची मूर्ती नसल्याबाबत विधान केले आहे. तुम्ही रामाचं सगळं करता, पण तिथे सीतेची मूर्ती का नाही अशी नाराजी महिलांची असल्याचं शरद पवारांनी सांगितले. राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल का असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला, त्यावर ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, राम मंदिर होऊन गेले, आता लोक चर्चाही करत नाहीत. अजिबात चर्चा होत नाही. एका बैठकीत माझ्यासमोर हा विषय निघाला. तुम्ही रामाचं सगळं करताय, सीतेची मूर्ती का बसवली नाही अशी तक्रार महिलांनी केली. मी महाराष्ट्रात फिरतोय, मला अनुकूल चित्र दिसतंय. लोकांमध्ये सरकारविषयी नाराजी आहे. घोषणा खूप झाल्या प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. देशाचं चित्र सध्या सांगता येणार नाही. पण लोकांशी बोलल्यावर सरकारबद्दल अजिबात आस्था नाही असं दिसतं असंही त्यांनी सांगितले.
जे सध्या टीका करतायेत, त्यांच्या विश्वासावर मी सगळं सोपवलं होतं. त्या विश्वासाला तडा त्यांनी दिला. त्यामुळे साहजिकच मला लक्ष द्यावं लागले. पाणी आणि चारा हा पुरंदर, बारामतीत दुष्काळाचा प्रश्न आहे. आजचं सरकार पाहिजे ते लक्ष देत नाही. लोकांना मदत करावीच लागेल असं शरद पवारांनी म्हटलं आहे.