पुणे,दि.7: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदाराला इशारा दिला. काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत उभी फूट पडली असल्यामुळे या निवडणुकीची चांगलीच चर्चा सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
खासदार शरद पवार यांची लोणावळ्यात सभा झाली. या सभेत शरद पवार यांनी दमदाटीवरुन अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांना इशारा दिला. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार सुनिल शेळके हे शरद पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला नेत्यांनी जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप केला आहे.
यावेळी बोलताना मावळचे आमदार सुनील शेळके यांना शरद पवार यांनी भरसभेत इशारा दिला आहे. तू आमदार कुणामुळे झाला, माझ्या वाटेला गेला तर मी सोडत नाही असा इशारा शरद पवार यांनी सुनील शेळके यांना दिला आहे. लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात असेही शरद पवार म्हणाले. लोणावळ्यात ते बोलत होते. त्यामुळे आता मावळमधील राजकारण तापलं आहे.
पुन्हा असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात
“तू आमदार कोणामुळे झाला? तुझ्या सभेला इथं कोण आलं होत? त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष कोण होतं? तुमच्या फॉर्मवर माझी सही आहे. माझ्या सहीने तुम्ही निवडूण आलात आणि आज तुम्ही त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांना तुम्ही दमदाटी करता. माझी विनंती आहे एकदा दमदाटी केलीत बस्स. पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने कधी जात नाही. पण त्या रस्त्याने जाण्याची स्थिती तुम्ही निर्माण केली तर सोडतही नाही,” असा इशारा शरद पवार यांनी नाव न घेता आमदार सुनील शेळकेंना दिला.