Sharad Pawar: पाच राज्यांच्या निकालावर शरद पवारांनी दिली ही प्रतिक्रिया

0

दि.१०: Assembly Elections Results 2022: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेवर येण्याची चिन्हं दिसत आहेत. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे लागलं होतं आणि इथे भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

पंजाबमधील काँग्रेसच्या दारुन पराभवानंतर काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी ट्विटरद्वारे पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. लोकांचा आवाज, हा देवांचा आवाज आहे. पंजाबच्या जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारला आहे, असं म्हणत सिद्धू यांनी ‘आप’चे अभिनंदनही केलं आहे.

योगी आदित्यनाथ पुढे जाणार हे नक्की होतं, पण अखिलेश यादव यांची चांगली कामगिरी असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. उत्तर प्रदेशचा निकाल ५ नंतर स्पष्ट होईल त्यानंतर बोलणं योग्य ठरेल असंही ते म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया

दिल्लीतल्या कामगिरीमुळे पंजाबचा आपमध्ये विजय झाला आहे. दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबने आपला स्वीकारलं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील बहुतांश शेतकरी दिल्लीत होते याचा परिणाम निवडणुकीत पहायला मिळाल्याचंही शरद पवार म्हणाले. लोकांनी दिलेल्या कौलाचा आदर केला पाहिजे असंही शरद पवार म्हणाले आहेत. सर्व विरोधक चर्चा करुन भाजपाला पर्याय देण्याबाबत चर्चा करु असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here