Sharad Pawar: पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.१७: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांनी (Sharad Pawar) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेने (ठाकरे गट) दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठाकरे गट आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होतं. यानंतर भाजपाने रविवारी रात्रीपासून यावर मंथन करत अखेर मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान शरद पवार यांनी यावर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सांगताच शरद पवारांनी “सहा ते सात अपक्ष आहेत. एक जरी अपक्ष उभा राहिला तर निवडणूक होईल,” असं सांगितलं. “माझी भाजपाकडे कोणतीही मागणी नव्हती. मी त्यांना कसं काय सुचवू शकतो. मी फक्त सल्ला दिला होता. सुचवल्यानंतर काहीतरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा होती. तसा निर्णय घेतला याचा आनंद आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं. उशिरा झाला असला तरी निर्णय झाला हे महत्त्वाचं आहे असंही ते म्हणाले.

“कोणाच्याही सांगण्याने झालं असेल तरी माझी हरकत नाही. माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर शंका उपस्थित करण्याची गरज नाही. ही वर्षं दीड वर्षांची निवडणूक होती. जे गृहस्थ गेले त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्यानंतर आपण असाच निर्णय घेतो,” असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान माघार घेण्यासाठी आवाहन करण्यास उशीर झाला का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “माझ्या दृष्टीने निर्णय झाला हे महत्वाचा आहे. हे असे निर्णय पटकन होत नसतात. त्यासाठी चर्चा, अभ्यास करावा लागतो”. भाजपा उमेदवारी मागे घेतल्याचं श्रेय राज ठाकरे यांना देत असल्याबद्दल विचारलं असता त्यांनी “कुणाच्याही कोंबड्यांनी दिवस उगवला तरी माझी हरकत नाही,” अशी मिश्किल टिप्पणी केली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. ते म्हणाले “५१ टक्के आम्ही ती लढाई जिंकलोच असतो. आमची पूर्ण तयारी झाली होती. आम्ही रणांगणात असून, वॉर्डात जुळवाजुळव झाली होती. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आम्ही १०० टक्के निवडणूक जिंकणार होतो. पुढील निवडणुकीला एकच वर्ष शिल्लक आहे हा विचारही करण्यात आला. यापूर्वी भाजपाने अनेकदा असा निर्णय घेतलाआहे. ही संस्कृती आजची नसून अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून अनेक उदाहरणं आहेत”.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here