पुणे,दि.२७: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. जबाबदार नेते इतके पोरकटपणे बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पाहिले आहे. याबाबत कोणत्याही चौकशीस तयार असून, जरांगे आणि माझे कॉल रेकॉर्ड खुशाल तपासा. त्याचबरोबर यांचीही चौकशी झाली पाहिजे. कर नाही, त्याला डर कशाला, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मंगळवारी येथे केला.
पुण्यातील बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जरांगे पाटील हे शरद पवार यांची स्क्रिप्ट वाचत असल्याचा आरोप सोमवारी केला होता. त्याला पवार यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. पवार म्हणाले, हे जबाबदार लोकांचे बेजबाबदार वक्तव्य आहे. यशवंतराव चव्हाणांपासून आत्ताच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक नेते पाहिले. मात्र, इतके नेतृत्व इतके खोटे बोलते, हे मी पाहिले नाही.
जरांगे यांचे उपोषण सुरू झाले, त्यानंतर पहिल्यांदा मी त्यांना भेटायला गेलो होतो. या भेटीत तुमच्या मागण्यांसंदर्भात
पाठपुरावा करू. मात्र, दोन समाजातील अंतर वाढू देऊ नका. तुमचा आग्रह समजू शकतो. मात्र, याबाबत काळजी
घ्या, असे मी त्यांना सांगितले.
आमच्यात एवढाच काय तो संवाद झाला. त्यानंतर एका शब्दाचेही त्यांचे आणि माझे बोलणे झाले नाही, संवाद झाला नाही. मात्र, आता यात मला नाहक ओढले जात आहे. जरांगे यांच्याशी
आपला काडीमात्र संबंध नाही. वाटेल ती चौकशी करा. आम्ही चौकशीस तयार आहोत. कर नाही त्याला डर कशाला? माझे व जरांगे यांच्यातील कॉल रेकॉर्ड खुशाल तपासावेत. मात्र, आमचे फोन तपासत असला, तर त्यांचेही फोन तपासले पाहिजे. एक फोन मी केला, हे सिद्ध झाले, तर तुम्ही म्हणाल, ते करायला तयार आहे.
राष्ट्रवादीतील बैठकीबद्दल बोलताना ते म्हणाले, बारामतीतील कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला. प्रत्येक मतदारसंघातील दीडशे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रातील मतदाराला पर्याय हवा आहे, असाच बैठकीतील सूर होता. जनतेची ही इच्छा असेल, तर त्याची पूर्तता करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यात
नक्कीच यश मिळेल. काही लोकांकडून दमदाटीचे फोन येतात, दबाव टाकला जातो, शैक्षणिक वा सहकारी संस्थेत
काम करणाऱ्यांना नोकरीस मुकावे लागेल, अशी धमकी दिली जाते, असे लोकांनी सांगितले. त्याच्या खोलात
आम्ही जाऊ. आम्ही विश्वास देतो. कुणी दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असेल, तर आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या
पाठीशी राहू. तुम्ही एकटे नाही, अशा शब्दांत पवार यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
राजेश टोपे यांच्याविरोधात आरोप करण्यात आले आहेत. ते बिनबुडाचे आहेत. मुळात याप्रश्नी टोपे यांची मदत
राज्य सरकार घेत होते. मात्र, एका बाजूला मदत घेणे व प्रहार करणे, असे होत असेल, तर उद्या या राज्य सरकारवर विश्वास कोण ठेवेल, असा प्रश्न त्यांनी केला. जरांगे यांना खासदारकी ऑफर दिल्याच्या आरोपाकडे लक्ष वेधले असता आता असे आरोप करतात. इतकी वेळ आली का यांच्यावर, अशी खिल्लीही त्यांनी उडविली.