शरद पवार मराठा आरक्षण विधेयकावर म्हणाले…

0

मुंबई,दि.21: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला. मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या.

पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी मराठा आरक्षण विधेयकावर सूचक विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या धोरणांवरही टीका केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच भारतीय जनता पार्टीबरोबर गेल्याने इंडिया आघाडीसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना शरद पवारांनीही यावर भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभामगृहांमध्ये मंजूर करुन घेतलं. या निर्णयामुळे मराठा समाजातील तरुणांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण लागू झालं आहे. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. काहींनी या आरक्षणाचं स्वागत केलं असलं तरी काहींनी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणत शिंदे सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. असं असतानाच आता शरद पवारांनाही या विधेयकावर सूचक विधान करताना हे मराठा आरक्षण टिकेल की नाही याबद्दल मनात शंका असल्याचं म्हटलं.

विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनीही हे आरक्षण म्हणजे गोरगरीब मराठ्यांची फसवणूक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

”कायदेशीर सल्ला याबाबत जे देतात त्यांच्या मनात शंका आहे, माझ्याही मनात शंका आहे. हा प्रश्न सुटला तर मला आनंदच आहे. पण, काल जे विधेयक संमत केलं. त्याचप्रमाणे असं विधेयक पास करत यापूर्वीही पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. पण, ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं नाही. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अशाच प्रकारचं आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं नाही,” अशी उदाहरणं शरद पवार यांनी दिली. तसेच, काही प्रश्न सुटत असतील तर केवळ विरोधासाठी विरोध नको म्हणून विधेयकास कुणीही विरोध केला नाही. त्यामुळेच, सर्वांनी एकमताने विधेयकाच्या बाजुने निर्णय घेतल्याचंही शरद पवार म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here