Sharad Pawar On VBA: निवडणुकीची तयारी आणि वंचितबाबत शरद पवार म्हणाले…

Sharad Pawar: वंचितला महाविकास आघाडीत घेण्याबाबत शरद पवार म्हणाले...

0

मुंबई,दि.५: Sharad Pawar On VBA: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणुकीची तयारी आणि वंचित बहुजन आघाडीबाबत सूचक विधान केलं आहे. आगामी निवडणुकीची भाजपा तयारी करत आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, त्यावर पवारांनी सूचक विधान केलं. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालावरून अद्यापही राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप तसेच शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने शिवसेना लढणार असेल तर आमचे समर्थन असेल, अशी भूमिका घेतली होती. यानंतर आता पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत केला जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाली असून, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. (Maharashtra Politics)

सध्या तरी मतदारसंघनिहाय आढावा घेतला नाही | Sharad Pawar On VBA

वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर, मला माहिती नाही. मी त्या चर्चेत नसतो. निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि ठाकरे गटाने एकत्र जावे ही आमची विचारधारा आहे. एकत्र बसून निर्णय घेऊ. सध्या तरी मतदारसंघनिहाय आढावा घेतला नाही. पण घ्यावा लागणार आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच भाजप निवडणुकीच्या तयारीला लागला आहे, असे विचारले असता कोण तयारीत आहे, हे निवडणूक निकालातून दिसेल, असे सूचक विधानही शरद पवार यांनी केले. 

…तर निकाल वेगळा लागला असता | Sharad Pawar

कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि काही महत्त्वाच्या भागातील भाजपची मते कमालीची घटली आहेत. यावरून राज्यकर्त्यांविरोधात नाराजी असल्याचे दिसून येते. दोन्ही मतदारसंघ वेगवेगळे आहेत. चिंचवडमध्ये राहुल कलाटे उभे राहिले नसते तर निकाल वेगळा लागला असता. पण लोकशाहीत प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, विधानसभेला अधिकार आहे. समिती नेमायची की नाही. ज्या लोकांनी समिती नेमायची आणि संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी केली. त्यांनाच त्या समितीत घेतले आहे. एखाद्याने तक्रार केली असेल आणि तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच जज म्हणून नेमले तर त्याचा निकाल कसा लागेल, हा आमचा प्रश्न आहे, असा मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here