Sharad Pawar On UCC: समान नागरी कायद्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

0

मुंबई,दि.30: Sharad Pawar On UCC: समान नागरी कायद्यावर शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या तयारीत आहे. समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्याबाबत चर्चा सुरु असतानाच मोदी सरकारला या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) समान नागरी कायद्याचं तत्वत: समर्थन केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार? | Sharad Pawar On UCC

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी समान नागरी कायद्यावरून (UCC) विरोधी पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदी सरकारच्या समान नागरी कायदा धोरणावर भाष्य करत समाचार घेतला. यावेळी त्यांनी समान नागरी कायदा आणि शीख धर्माबाबत काळजी व्यक्त केली. तसेच लोकांमध्ये मोदी सरकारविरोधात नाराजी आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी या कायद्याचा प्रस्ताव आणल्याचा आरोप पवारांनी केला. ते गुरुवारी (29 जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यात मोदींनी समान नागरी कायद्यावर त्यांनी मत मांडलं. ते म्हणाले की, एका देशात दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात. यावर माझ्या पक्षाची भूमिका मी सांगतो. केंद्र सरकारने विधी आयोगाकडे (लॉ कमिशन) हा विषय सोपवला. विधी आयोगाने या कामात रस असलेल्या विविध संस्थांकडून प्रस्ताव मागितले.”

विधी आयोगाने खोलात जाऊन…

“यानंतर विधी आयोगाकडे 900 प्रस्ताव आले आहेत. त्या प्रस्तावांमध्ये काय म्हटलं आहे हे मला माहिती नाही. तसं विधी आयोगानेही जाहीर केलेलं नाही. असं असलं तरी विधी आयोगासारखी जबाबदार संस्था या विषयाच्या खोलात गेली आणि त्यांनी लोकांचे अभिप्राय मागवले आणि 900 अभिप्राय आले. आता विधी आयोगाने खोलात जाऊन या प्रस्तावांमध्ये काय शिफारसी आहेत याची माहिती देणं गरजेचं आहे,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

शीख धर्मात समान नागरी कायद्यावर वेगळं मत आहे

शरद पवार पुढे म्हणाले, “समान नागरी कायद्यावर शीख, ख्रिश्चन, जैन धर्मांची भूमिका काय आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. मला काळजी एका गोष्टीची आहे की, शीख धर्मात समान नागरी कायद्यावर वेगळं मत आहे, असं माझ्या कानावर आलं आहे. समान नागरी कायद्याला पाठिंबा देण्याची शीख धर्मियांची मनस्थिती नाही. त्याबाबत मी अधिक माहिती घेत आहे.”

“शीख धर्मातील लोकांच्या मतांकडे दुर्लक्ष करणे किंवा विधी आयोगाकडे आलेल्या शिफारशींची नोंद न घेता यावर निर्णय घेणं योग्य होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रश्नाला हात घातला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची एकदा स्पष्टता यावी. यावर पंतप्रधान मोदींनी किंवा इतर कुणी भूमिका मांडावी. त्यानंतर माझा राजकीय पक्ष यावर निर्णय घेईन. पूर्ण माहिती आल्यावरच निर्णय घेणं योग्य होईल,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे की काय अशी शंका…

समान नागरी कायद्याची चर्चा आत्ताच का होते आहे यावर शरद पवारांनी शंका व्यक्त केली. ते म्हणाले, “देशातील चित्र बघितल्यानंतर लोकांमध्ये सध्याच्या राज्यकर्त्यांविषयी नाराजी व अस्वस्थता आहे. या नाराजी आणि अस्वस्थतेपासून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे की काय अशी शंका यायला आज जागा आहे. ही अस्वस्थता पंतप्रधान मोदींमध्ये असावी. कारण यानंतर एका वर्षात देशाच्या निवडणुका येतील. मधल्या काळात मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही राज्यांच्या निवडणुका आहेत.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here