बारामती,दि.३१: दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे सांभाळणार आहेत. अजित पवारांच्या (Ajit Pawar) निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी चर्चाअंती राष्ट्रवादीची सुत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठे विधान केले आहे.
राष्ट्रवादीने (अजित पवार गट) आज शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्ष निवडीसाठी आमदारांची तातडीची बैठक विधान भवनात बोलविली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्यावर त्या सायंकाळी 5 वाजता लोकभवन येथे छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. शनिवारी सकाळी बारामती येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. (Sharad Pawar On Sunetra Pawar)
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, मला माहिती नाही. मी याबाबत आज सकाळीच वाचले. सुनेत्रा पवार यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे.
“जे गेले आहेत त्यांना परत आणले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी जबाबदारी घेण्यासाठी तयार होत असेल तर आम्हाला आत्मविश्वास मिळू शकतो. ते गेले म्हणून कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्यातून पक्षाने सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे देण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय,” असं शरद पवार यांनी स्पष्ट केले.








