सोलापूर,दि.8: सबंध देशातल्या लोकांच्या लक्षात आले नाही ते या गावकऱ्यांच्या लक्षात आले असे म्हणत मारकवाडी गावातील नागरिकांचे शरद पवार यांनी कौतुक आणि अभिनंदन केले. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि.8) सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडी या गावाला भेट दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालावरून मारकवाडी गावातील नागरिकांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता.
शरद पवारांनी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक होते याचा उल्लेख करत निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्याच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. शरद पवार म्हणाले की, लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते आहेत, राज्यसभेमध्ये मी आहे. आम्ही गेले दोन-तीन दिवस बघतोय की, तिथले खासदार देशातल्या अनेक राज्यांचे आम्हाला भेटतात, ते दुसरी काहीही चर्चा करत नाहीत, तर तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की, हे गाव कुठे आहे? हे सबंध देशातल्या समंजस आणि शहाण्या लोकांच्या लक्षात आलं नाही, ते या गावकऱ्यांच्या लक्षात कसं आलं? तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन आज देश करतोय याचा आम्हा सर्वांना आनंद आहे.”
”अमेरिका हा आज जगातला मोठा देश आहे. अमेरिकेमध्ये मत मतपेटीत टाकलं जातं. जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड तिथेही मत मतपेटीमध्ये टाकलं जातं. युरोप खंडातले सर्व देश हे आपल्यासारखे ईव्हीएमवर निवडणुका घेत नाहीत. अमेरिकेने आणि काही देशांनी एकेकाळी ईव्हीएमचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की, आता हे ईव्हीएम नको. काय असेल ते लोकांना मतपेटीत टाकण्याचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि त्यांनी तो दिला. अख्खं जग करतंय आमच्याच देशात का? आमच्याकडे शंका निर्माण होतेय. त्या शंकेमुळे लोक अस्वस्थ आहेत, काही गोष्टी दिसतात.