“भाजपा आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न…” शरद पवार

0

मुंबई,दि.19: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीच्या प्रयोगाबाबत नवा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी पक्षाला 2004 मध्ये संधी असताना मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही? असा सवाल वारंवार अजित पवार गटाकडून उपस्थित केला जात होता. यावरही शरद पवार यांनी मुलाखतीत खुलासा केला आहे.

शरद पवार यांनी लोकसत्ताच्या लोकसंवाद या कार्यक्रमात अनेक खुलासे केले. अजित पवार अनुभवाने नवे होते आणि छगन भुजबळांना मुख्यमंत्री केल्यास पक्ष फुटला असता. त्यामुळं त्यावेळी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं, असं शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 2004 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग 2019 मध्ये केला. हा प्रयोग 2014 मध्येही करण्याचा माझा प्रयत्न होता, पण तो यशस्वी झाला नाही, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे.

भाजपा आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न…

‘2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर भाजपने न मागताच मी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यामागे शिवसेनेला भाजपबरोबर जाण्यापासून रोखायचे होते. कारण भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याचवेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याचा माझा प्रयत्न होता. पण उद्धव ठाकरे भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले आणि महाविकास आघाडीचा प्रयोग फसला होता’, असा खळबळजनक खुलासा शरद पवार यांनी केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here