शरद पवारांनी सांगितले अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला?

0

पुणे,दि.३: अंधेरी ( पूर्व ) विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक होत आहे. आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी निधन झाले होते. अंधेरी ( पूर्व ) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात थेट ‘सामना’ या ठिकाणी होणार आहे. त्यात शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला पाठिंबा देणार? अशी चर्चा सुरु होती. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

पुण्यात काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या नवरात्र महोत्सवात महर्षी पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना अंधेरी पूर्व निवडणुकीत कोणाला पाठिंबा दर्शवणार, असा सवाल विचारला. त्यावर “राष्ट्रवादी पक्ष अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला मदत करणार,” असे शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

अंधेरी (पूर्व) च्या विधानसभा जागेवर एकनाथ शिंदे गट दावा करण्याच्या तयारीत असून, भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर शिंदे गट दावा करीत आहे.

शिवसेना-भाजप युती २०१९ मध्ये असताना ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपाचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. लटके यांनी त्यांचा १६९६५ मतांनी पराभव केला, तरी ४५८०८ मते मिळवून ते दुसऱ्या स्थानी होते. लटके यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चांगली मैत्री होती. त्यामुळे शिवसेनेची ही जागा शिंदे गटाला मिळायला हवी, असे काही नेत्यांना वाटत आहे. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक लढवू नये, असाही एक मतप्रवाह शिंदे गटामध्ये आहे. मात्र, भाजपाने काही काळापासून ही जागा लढविण्याची तयारी सुरू केली असून, मुरजी पटेल यांनी कामही सुरू केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here