Sharad Pawar: शरद पवार यांची अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली महत्वाची मागणी

0

मुंबई,दि.१७: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मागणी केली आहे. दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना शिवसेनेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून ऋतुजा लटके यांना भाजपाने पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती.

राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर जर मुंडे कुटुंबातील कुणी निवडणुकीला उभं राहणार असेल तर उमेदवार देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक देखील बिनविरोध व्हावी असं मी आवाहन सर्व संबंधित पक्षांना करत आहे”, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके यांना पाठिंबा देत आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपाला उमेदवार मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर संबंधित पोटनिवडणुकीत उमेदवार दिला नव्हता याची आठवण देखील करुन दिली.  

“मला वाटतं की अंधेरीतील पोटनिवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल आणि महाराष्ट्रात यातून योग्य संदेश जाईल. निवडणुकीत कोणतीही प्रतिष्ठा न करता योग्य संदेश जाणं महत्वाचं आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन मी सर्वांना करतो”, असं शरद पवार म्हणाले. 

दरम्यान, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्यासाठीचं पत्र लिहिलं. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं. “त्यांची त्यांच्या पक्षाची भूमिका घेतली. मी माझ्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी पत्रात काय म्हटलंय याची कल्पना मला नाही. मी ते पत्र वाचलेलं नाही”, असं शरद पवार म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here