शरद पवार यांच्या बैठकीत चक्क भाजपाचा कार्यकर्ता

0
शरद पवार यांच्या बैठकीत चक्क भाजपाचा कार्यकर्ता

सोलापूर,दि.२९: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला सोलापूर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी स्वतः न जाता चक्क भाजपा कार्यकर्त्याला पाठवले. यामुळे संतप्त झालेल्या जुन्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खरटमल यांच्या जोडबसवना चौकातील गॅस एजन्सीच्या कार्यालयात धडक देऊन त्यांना जाब विचारला.

शरद पवार यांनी मंगळवारी मुंबई येथे सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादीची बैठक बोलावली होती. जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासह काही निवडक ज्येष्ठ नेत्यांना बैठकीचे निमंत्रण होते. सोलापूर शहरातून ज्येष्ठ नेते महेश गादेकर, भारत जाधव आणि  माजी महापौर, ॲड. यू. एन. बेरिया उपस्थित होते. या बैठकीस शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दांडी मारली. स्वतः शहराध्यक्ष खरटमल बैठकीला गेले नाहीत परंतु त्यांचा प्रतिनिधी म्हणून भाजपा कार्यकर्ता महेश गाडेकर याला पाठवले.

त्यांच्या या कृत्याने राष्ट्रवादीचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच भडकले. मंगळवारी सायंकाळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खरटमल यांना याचा जाब विचारला. त्यावर खरटमल यांनी गाडेकर हा कोणत्या का पक्षाचा असेना पण तो माझा कार्यकर्ता आहे, असे उत्तर दिल्याने कार्यकर्ते अधिकच भडकले.

यामुळे जुन्या व पवारनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला आपल्याला जाता येत नसेल तर शहराध्यक्ष म्हणून काम का करत आहात असा जाब विचारला. शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या या प्रकारामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात एकच खळबळ उडाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here