शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; तर्क-वितर्कांना उधाण!

0

मुंबई,दि.२९: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या मुद्यांवरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यातील काही मंत्री, सत्ताधारी आघाडीतील काही नेतेमंडळींच्या घरांवर टाकलेल्या धाडी यामुळे राजकीय तणाव निर्माण झालेला असताना दुसरीकडे राज ठाकरेंच्या सभांमुळे वातावरण चांगलंच तापू लागलं आहे.

राज ठाकरेंनी पाडवा मेळावा आणि नंतर ठाण्यातील उत्तर सभेमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून मांडलेली भूमिका वादासाठी कारणीभूत ठरू लागली आहे. तसेच, त्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळत होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केल्याचं वृत्त टीव्ही ९ नं दिलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या दोन्ही शीर्षस्थ नेत्यांनी प्रत्यक्ष बैठक वा भेट घेतल्याचे प्रसंग अगदीच दुरापास्त झालेले असताना आज अचानक ही भेट घेण्याचं कारण काय ठरलं? यावरून आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

दीड तास झाली चर्चा

दरम्यान, या भेटीमध्ये नेमकी कशासंदर्भात चर्चा झाली, यावरून तर्क वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण, आरोप-प्रत्यारोप, भाजपाची आक्रमक भूमिका, भोंग्यांचं राजकारण, मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुका, राज ठाकरेंच्या सभा, इंधन दरवाढीचा फटका, त्यावरून होणारं राजकारण अशा अनेक मुद्द्यांचा या बैठकीत दोन्ही प्रमुख नेत्यांनी आढावा घेतला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here