शरद पवार उद्या सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरात मेळावा; महेश कोठे यांच्याकडे भोजन

0

सोलापूर,दि.७:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) हे शुक्रवार, ८ ऑक्टोबर रोजी सोलापूर (Solapur) दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने हुतात्मा स्मृती मंदिरात शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची स्वतंत्रपणे बैठक घेणार आहेत. विशेष म्हणजे ते माजी महापौर महेश कोठे (Mahesh kothe) यांच्या निवासस्थानी भोजन घेणार आहेत.

यानंतर ते व्यापारी, उद्योजक व विविध समाजातील प्रमुखांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.

पवार यांचे शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता बारामती येथून हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत ते शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत हुतात्मा स्मृती मंदिरात राष्ट्रवादीच्या शहरातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

यानंतर दुपारी १२.४५ ते २ वाजेपर्यंत माजी महापौर महेश कोठे यांच्या निवासस्थानी भोजन घेणार आहेत. याठिकाणी शहरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींची ते चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. याकडे राजकीय जाणकारांचे विशेष लक्ष लागले आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत हुतात्मा स्मृती मंदिरात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी ४ ते ५ या वेळेत व्यापारी, उद्योजक, चेंबरचे पदाधिकारी व विविध समाजातील प्रमुख मान्यवरांशी पवार हे चर्चा करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता मोटारीने ते बारामतीकडे रवाना होणार आहेत. पवार यांच्या या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवक व तौफिक शेख यांचा प्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here