जळगाव,दि.26: युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी (Sharad Koli) यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी आम्ही शहीद झालो तरी चालेल असे म्हटले आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव करण्याचा निर्धार, ठाकरे गटाचे युवासेना नेते शरद कोळी यांनी केला. महाप्रबोधन यात्रेत जिल्हाबंदी असलेले शरद कोळी हे आज धरणगाव (Dharangaon) पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
युवा सेनेचे राज्य विस्तारक असलेले शरद कोळी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघातून आव्हान दिलं आहे. शरद कोळी हे आज धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी आले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना 2024 ची निवडणूक ही मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात लढणार असल्याचा निर्धार केला.
गुलाबराव पाटील यांचं राजकारण हे दादागिरीच्या जीवावर
मंत्री गुलाबराव पाटील यांचे 30 ते 40 वर्षाचं राजकारण हे दादागिरीच्या जीवावर चालले आहे. मंत्रिपदाचा दुरुपयोग करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप शरद कोळी यांनी केला. धरणगाव आणि जळगाव जिल्ह्यातील दादागिरी मोडून काढण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात दंड थोपटणार असून, जळगाव ग्रामीण मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवणार असल्याचं शरद कोळी यांनी जाहीर केलं.
शरद कोळी काय म्हणाले?
2024 मध्ये गुलाबरावांना ना भूतो ना भविष्य त्यांना मुळासकट उपटून काढणार. यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी आम्ही शहीद झालो तरी चालेल, पण आम्ही आता थांबणार नाही. 30-40 वर्षापासून इथे दादागिरी चालू आहे. कोळी समाजाच्या जीवावर, शिवसेनेच्या जीवावर निवडून येऊन दादागिरी सुरु आहे. पण एकच सांगतो, तुम्ही मंत्रिमंडळाचा गैरवापर करुन, गोरगरिबांना त्रास देताय, ही दादागिरी मोडून काढणार. त्यासाठी 2024 मध्ये मी गुलाबरावांविरुद्ध निवडणुकीला उभं राहणार, त्यांचा पराभव करणार, असा निर्धार शरद कोळी यांनी बोलून दाखवला.
शरद कोळींची धरणगाव पोलीस ठाण्यात हजेरी
युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी महाप्रबोधन यात्रेतील धरणगाव येथील भाषणात मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी शरद कोळी यांनी आज धरणगाव पोलीस ठाण्यात हजेरी लावली. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची महाप्रबोधन यात्रेतील सभा धरणगावात पार पडली होती. या सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध वक्तव्य केल्याचा आरोप करत, शरद कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांना जळगाव जिल्हा बंदी सुद्धा करण्यात आली होती.