शाहरुख खानचा पुत्र आर्यन खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0

मुंबई,दि.७:क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबीला धक्का बसला आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य सात आरोपींच्या एनसीबी कोठडीत वाढ करण्याची एनसीबीची विनंती न्यायालयाने फेटाळली आहे. त्याचवेळी न्यायालयाने आर्यन खानसह सर्व आठ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून आर्यन खानतर्फे लगेचच ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. त्याच्यासह अन्य आरोपींच्या वकिलांनीही अंतरिम जामिनासाठी विनंती करत अर्ज सादर केले आहेत. मुख्य म्हणजे ‘तुम्ही सर्वांनी सहकार्य केल्यास जामिनाविषयी सुद्धा आताच सुनावणी घेऊन निर्णय देण्याची तयारी आहे’, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कोर्टात युक्तीवादादरम्यान आर्यनच्या वकिलांनी कोर्टात ड्रग्ज पार्टीच्या रात्री नेमकं काय झालं, एनसीबी अधिकाऱ्यांनी काय-काय विचारलं ती सर्व माहिती दिली.

किला कोर्टात आर्यनचे वकील सतीश माने-शिंदे यांनी आर्यनची बाजू मांडली. यावेळी आर्यनसोबत घडलेला सगळा घटनाक्रम त्यांनी सांगितला. आर्यनने नेमकं काय-काय सांगितलं तीच माहिती सतीश यांनी कोर्टात मांडली. “मी क्रूज टर्मिनल पोहोचलो तेव्हा तिथे अरबाजही होता. मी त्यांना ओळखत होतो त्यामुळे आम्ही दोघं शिपच्या दिशेला निघालो. मी तिथे पोहोचताच त्या लोकांनी मला सोबत ड्रग्ज बाळगलं आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर मी नाही असं उत्तर दिलं. त्यांनी माझ्या बॅगेची झडती घेतली. त्यानंतर माझी झडती घेतली. त्यांना काहीच मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी माझा फोन घेतला. त्यानंतर ते मला एनसीबी ऑफिसमध्ये घेऊन गेले. त्यानंतर रात्री दीड-दोन वाजेपर्यंत वकिलांना भेटण्याची अनुमती दिली गेली. एनसीबीने माझ्या फोनने सर्वकाही डाऊनलोड केलं. त्यानंतर त्याच बेसिसवर माझी चौकशी करायला सुरुवात केली. खरंतर मला त्या रात्रीबद्दल काहीच तक्रार नाही”, अशा शब्दात आर्यनने भूमिका मांडल्याची माहिती वकील सतीश माने-शिंदे यांनी दिली.

“माझा एक प्रतिक नावाचा मित्र आहे. त्याने मला फोनवर सांगितलं होतं की अशा पार्टीसाठी वीवीआयपीच्या रुपात निमंत्रण येईल म्हणून. प्रतीक गाबा हा फर्नीचरवालासोबत संपर्कात होता. फर्नीचरवलाला ती व्यक्ती आहे जी व्यक्ती आयोजकांच्या कायम संपर्कात होती. पार्टीत मी ग्लॅमर तडाका टाकावा याच निमित्ताने कदाचित मला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं असेल”, अशी भूमिका आर्यनची असल्याचं वकिलांनी सांगितलं.

“मला असं म्हणायचं नाही की अरबाज माझा मित्र नाही. पण त्याच्या कोणत्याही हालचालींची मला खरंच कल्पना नव्हती. प्रतीक देखील अरबाजचा मित्र आहे. पण माझी काहीच तक्रार नाही. माझा कोणत्याही आरोपीसोबत संपर्क नाही”, अशीही भूमिका वकिलांनी कोर्टात सांगितली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here