सोलापूर,दि.17: कथित हॉटेल बिल प्रकरणावरून सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी गंभीर आरोप केला आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना हॉटेलमालकाने रस्त्यावर अडवून बिलाचे पैसे मागितल्याची घटना सोलापूर दौऱ्यात घडली. सदाभाऊ खोत कारमधून खाली उतरताच मांजरी येथील अशोक शिनगारे यांनी त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्यांना जाब विचारू लागले. 2014 साली लोकसभा निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्यातील मांजरी येथे एका हाॅटेलमध्ये राहिलेले 66 हजार 450 रुपये बिलाचे देण्याचे राहिले असल्यामुळे हाॅटेल मालकाने ताफा अडवला.
राष्ट्रवादी काँग्रेसपासून (NCP) आपल्या जीविताला धोका असल्याचा आरोप सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केला आहे. गुरुवारी कथित हॉटेल बिलाच्या थकबाकीवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे राष्ट्रवादीचा लाल टोमॅटोसारखा गाल असलेला नेता आहे असाही आरोप खोत यांनी केला. ताफा अडवून पैसे मागणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.
सदाभाऊ खोत म्हणाले की, ज्या व्यक्तीनं मला अडवले त्याला विचारलं असता, त्या व्यक्तीने 2014 साली लोकसभा निवडणुकीदरम्यान आपले कार्यकर्ते माझ्या हॉटेलात जेवून गेले मात्र अद्याप बिलाची रक्कम चुकती केलेली नाही अशी अस्पष्ट आणि अपुरी माहिती पुरवली. खोलवर विचारणा केली असता सदर व्यक्तीने आपलं नाव अशोक शिनगारे असल्याचं सांगितलं. मात्र ह्याबाबत कोणतीही ठोस माहिती तो देऊ शकला नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान माझा कोणताही कार्यकर्ता अथवा प्रचारक साधा हॉटेलात चहासुद्धा पित नव्हता कारण आमच्याकडे पैसे नव्हते. मग हजारो रुपयांचं हॉटेलचं बिल होणं अशक्य आहे असं सांगत त्यांनी आरोप फेटाळून लावला.
त्यानंतर आज सदाभाऊ खोत यांनी अशोक शिनगारे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. अशोक शिनगारेंविरोधात विविध गुन्हे दाखल असून सोने चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती खोत यांनी दिली. शिनगारे यांच्याविरोधात चोरीसह आठ गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय चेक बाउन्स प्रकरण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली शिनगारेंविरोधात गुन्हा दाखल असल्याचे खोत यांनी सांगितले. हल्ला करायचा असा त्यांचा एकंदरीत प्लॅन होता. परंतु त्याचं टायमिंग चुकले आणि आम्ही लवकर आलो. तो बराच वेळ नुसताच कुबांड रचून एकच गोष्ट दहा वेळा सांगत होता. हल्ला करायला लोक येणार होते ते लवकर येत नव्हते, त्यामुळे त्याला जी स्क्रिप्ट दिली होती ती पुन्हा पुन्हा सांगत होता. म्हणून हा हल्ला का झाला तर भाऊंनी पैसे दिले नाहीत म्हणून या कार्यकर्त्यांनी सदाभाऊवर हल्ला केला असे त्यांना चित्र महाराष्ट्रभर घालवायचं होतं.
गुरुवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे टोमॅटोसारखे लाल गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात आहे. त्याने या व्हिडिओसाठीची तयारी केली होती. शिनगारे यांना जेवढे सांगितले होते, तेवढीच वाक्ये तो बोलत होता असेही त्यांनी म्हटले. ताफा आल्यानंतर पद्धतशीरपणे व्हिडिओ काढून व्हायरल केला असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. या नेत्याचे नाव योग्य वेळी सांगणार असल्याचे सांगितले.
शिनगारे यांच्याविरोधात तक्रार
सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवणाऱ्या अशोक शिनगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अटकाव केल्याचा आरोप हॉटेल मालक अशोक शिनगारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रयत क्रांती संघटनेचे सांगोला तालुकाध्यक्ष भारत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सांगोला पोलीस ठाण्यात भादंवि कलम 341, 186, 504 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.