मुंबई,दि.5: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुप्त भेट घेतल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केलेला दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटाळून लावला आहे. राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार संपणार आहे.
एका सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, 28 मे 2023 रोजी सुजय विखे पाटील आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटले. त्यानंतर 5 जून 2023 रोजी राधाकृष्ण विखे पाटील आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली.
भाजपाचे नेते काँग्रेसच्या नेत्यांना भेटताहेत आणि काँग्रेसवाले गाफील राहिल्यासारखे दिसताहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. या दाव्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला आहे. राधाकृष्ण विखेंकडून पुन्हा एकदा काँग्रेसकरिता धडपड सुरू झाली आहे, असं माझ्या कानावर आलं होतं. कुणाची सत्ता येणार हे त्यांना सर्वांच्या आधी लवकर कळतं, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यानुसार त्यांनी आतापर्यंत पक्षांतरं केली आहेत. मागच्या 20-25 वर्षांत 5-7 वेळा त्यांनी अशी पक्षांतरं केलेली आहेत. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अशी बेजबाबदार विधानं करणं योग्य नाही, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे.