मुंबई,दि.14: रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसंग्रामचे माजी आमदार विनायक मेटे आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं रस्ते अपघातामध्ये निधन झालं. सीटबेल्ट न लावल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. सहप्रवासी सीटबेल्ट लावत नसल्यामुळे अपघातात मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे, त्यामुळे आता सहप्रवाशांनाही सीटबेल्ट लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. ड्रायव्हर व सहप्रवाशांनाही सीटबेल्ट लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
मुंबईमध्ये तुमची कार सुरू करण्याआधीच तुम्हाला सावध व्हावं लागणार आहे, कारण ट्रॅफिक पोलिसांनी नवा आदेश काढला आहे. मुंबईत गाडी चालवत असताना आता ड्रायव्हरसोबतच त्याच्या सहप्रवाशांनाही सीटबेल्ट लावणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी हा नवा आदेश जारी केला आहे. या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर मुंबई ट्रॅफिक पोलीस कडक कारवाई करणार आहेत.
ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या आदेशानुसार ज्या कारमध्ये सिटबेल्ट नाही किंवा ज्या कारमधला सिटबेल्ट खराब आहे, त्यांनी कारमध्ये सिटबेल्ट 31 ऑक्टोबरपर्यंत लावून घ्यावेत. 1 नोव्हेंबरपासून कारमध्ये सीटबेल्ट लावणं कम्पलसरी करण्यात आलं आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी छोट्या गाड्यांमध्ये एयरबॅग्स वाढवण्याचे आदेश दिले होते, पण या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आता एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.