SBI चा ग्राहकांना इशारा, सोवा व्हायरस तुमचे बँक खाते करू शकतो रिकामे

0

दि.3: SBI ने ग्राहकांना इशारा दिला आहे. सोवा व्हायरस (Sova Virus) तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. स्मार्टफोन वापरणारे खासकरून अँड्रॉइड फोन (Android Phone) वापरणाऱ्यांना जास्त धोका आहे. जर तुम्ही कोणतंही ॲप डाऊनलोड करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोवा मालवेअरमुळे (Sova Trojan) तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे उडू शकतात असा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना दिला आहे. ॲपच्या माध्यमातून हे वायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करेल आणि तुमच्या किमती असेट्सवर डल्ला मारु शकेल असं एसबीआयने सांगितलं आहे. कॅनरा बँकेनेही (Canara Bank) त्याच्या ग्राहकांना ही खबरदारीची सूचना दिली आहे. ही सूचना खासकरून अँड्रॉइड फोनसाठी आहे.

सोवा व्हायरस

एसबीआयने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सोवा हे एक ट्रोजन मालवेअर आहे, जे बँकिंग ॲप्स वापरणाऱ्या ग्राहकांच्या पर्सनल डेटावर डल्ला मारते. यासंबंधीची सर्व गुप्त माहिती चोरली जाते. ज्या वेळी तुम्ही तुमचे बँकिंग ॲप वापरत असाल त्यावेळी हे मालवेअर क्रेडेंशियल्स रेकॉर्ड करते. याला ओळखणे आणि बाहेर काढणे हे अवघड आहे.

सुरुवातीला एका फेक मेसेजच्या माध्यमातून हे तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतं. त्यानंतर हे ट्रोजन तुमच्या सध्याच्या सर्व ॲप्सची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवतं. नंतर हॅकर्स कमांड आणि कंट्रोलच्या माध्यमातून तुमच्या फोनमध्ये एक व्हायरस पाठवतो. त्याचसोबत एक यादीही पाठवली जाते ज्यामध्ये टार्गेट करण्यात येणाऱ्या ॲप्सची माहिती असते. जर या ॲप्सचा तुम्ही वापर केला तर व्हायरस त्याचा डेटा हा एक्सएमएल फाईलमध्ये स्टोअर करते, त्याचा ॲक्सेस हा हॅकर्सला सहज मिळतो.

एकदा का हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये आला तर त्याला बाहेर काढणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे यापासून वाचायचं असेल तर खबरदारी घेणं हा सोपा उपाय आहे. सुरक्षेची खात्री असल्याशिवाय तुम्ही कोणतेही ॲप डाऊनलोड करु नका. ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचा रिव्ह्यू वाचा. ॲप डाऊनलोड करताना तुम्ही कोणत्या गोष्टींना परवानगी देता याची खात्री करा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here