SBI On Adani Group: एसबीआयने सांगितले अदानी समूहाला किती देण्यात आले कर्ज

0

मुंबई,दि.2: SBI On Adani Group: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने अदानी समूहाला (Adani Group) किती कर्ज देण्यात आले आहे ते सांगितले आहे. गौतम अदानीमुळे (Gautam Adani) LIC आणि SBI मधील कोट्यवधी गुंतवणुकदारांचे कष्टाचे पैसे धोक्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार हिंडनबर्ग संशोधन संस्थेने उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगवलेला फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी समूहातील गैरव्यवहार ही सामान्य घटना नसून उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ संबंध पाहता सेबी व रिझर्व्ह बँकेने या हेराफेरीची गंभीरपणे चौकशी केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली होती.

अदानी समूहाच्या कंपन्यांना… | SBI On Adani Group

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गच्या अहवालानंतर, गौतम अदानी समूहाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. या अहवालात अदानी समूहावरूल कर्जासंदर्भातही मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यानंतर, अदानी समूहाच्या कंपन्यांना 2.6 बिलियन डॉलर अर्थात 21,000 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले असल्याचे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने म्हटले आहे. एसबीआयने दिलेल्या कर्जात परदेशी युनिट्सच्या $200 मिलियनचाही समावेश आहे.

अदानी समूहाच्या कंपन्या लोनची परत फेड करत आहेत | SBI

ब्ल्युमबर्गच्या अहवालानुसार, एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा म्हणाले, अदानी समूहाच्या कंपन्या लोनची परत फेड करत आहेत. बँकेने आतापर्यंत जे काही उधार दिले आहेत, त्यासंदर्भात कोणतीही अडचण दिसत नाही. यातच, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांकडून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या जोखमीचे विवरण आणि कर्जाची संपूर्ण माहिती मागवली आहे.

PNB चे किती कर्ज?

पंजाब नॅशनल बँकेने अदानी समूहाला जवळपास 7,000 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यापैकी 2,500 कोटी रुपये विमानतळ व्यवसायाशी संबंधित आहेत.

अदानी समूहाचा कायदेशीर कारवाईचाही इशारा

खरे तर, अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर जबरदस्त कोसळले आहेत. यामुळे ज्या बँकांनी अदानी समूहाला कर्ज दिले आहे, त्याच्या संदर्भातही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच, अदानी समूहाने हिंडेनबर्गचे आरोप वारंवार फेटाळले आहेत आणि अहवाल ‘बनावट’ असल्याचे म्हणत, कायदेशीर कारवाईचाही इशाराही दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here