लिंगायत समाजाच्या मागण्या संदर्भात शासनाने ठोस भूमिका घ्यावी: आमदार सत्यजित तांबे

1

मुंबई,दि.28: राज्यातील लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांबाबत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे शासनाचे लक्ष वेधून समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. लिंगायत समाजाच्या विविध मागण्या संदर्भात अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी निवेदनाद्वारे आमदार सत्यजित दादा तांबे यांच्याकडे मागणी केली होती.

आमदार सत्यजित तांबे यांची मागणी

त्याची तात्काळ दखल घेत विधान परिषदेत 24/7/2023 रोजी हा मुद्दा उचलून शासनाने याबाबत ठोस भूमिका घ्यावी अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.

आमदार तांबे म्हणाले की राज्यातील लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. दिनांक 18 मे 2018 व 20 जानेवारी 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथी गृहावर सविस्तर बैठक झाली होती. या बैठकीत बहुतेक सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे 29 जानेवारी 2023 रोजी लिंगायत समाजाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले. यावेळी पुन्हा शासनाच्या वतीने समाजाच्या 70 टक्के मागण्या पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली.

मात्र या घोषणाबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्यात यावी, राज्यातील लिंगायत धर्माला अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मंजूर असलेल्या महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, मुंबई येथील विधान भवन परिसरात महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा व महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे या पाच प्रमुख मागण्या लिंगायत समाजाने केलेल्या असून काही मागण्यांबाबत जुजबी कार्यवाही झालेली आहे. मात्र ठोस कार्यवाही होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने आ. सत्यजित तांबे यांचे अभिनंदन करून आभार मानले आहे. लिंगायत समाजातील अनेक संघटनानी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. महाराष्ट्रातील लिंगायत समाज समाधान व्यक्त करत आहेत.


1 COMMENT

  1. लिंगायत समाजाच्या मागण्या खूप आहेत अनेक लोकांच्या दाखल्यावर जातीचा स्पष्ट उल्लेख नाही.
    लिंगायत समाजाला अल्पसंख्यांक दर्जा त्वरित मिळावा. लिंगायत समाजातील पोट जाती हा एकच जाती असून त्याच्यामध्ये फरक नाही सरसकट सर्वांना आरक्षण मिळावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here