मुंबई,दि.१: निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत आज ‘सत्याचा मोर्चा’ (Satyacha Morcha) निघणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह डाव्या पक्षांचे वरिष्ठ नेते या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. मतचोरी विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत मोर्चाचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा विजय मिळाला होता. मात्र हा विजय निवडणुकीत घोळ करून मिळालेला आहे असे म्हणत विरोधी पक्षांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवून लोकशाहीचा आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी तसेच मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात आज (शनिवारी) विरोधी पक्ष मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढणार आहेत.
दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रिटवरून हा मोर्चा सुरू होणार असून मेट्रो सिनेमाच्या समोरून तो महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबेल. महाराष्ट्रात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये हेराफेरी करून भाजप सरकार सत्तेवर आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला.
त्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही वापरल्या जाणार आहेत, मात्र तत्पूर्वीच विरोधी पक्षांनी वज्रमूठ एकवटत त्या याद्यांमधील घोळ पुराव्यासह समोर आणले आहेत. मतदार यादीमध्ये लाखो बोगस आणि दुबार नावे आढळली आहेत.
सत्ताधारी पक्ष मतचोरी करून निवडणुकीत फायदा घेत आहेत असा विरोधी पक्षांचा दावा आहे. मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतरही काहीच ठोस कारवाई आयोगाकडून झालेली नाही. त्याचा निषेध या मोर्चाद्वारे नोंदवला जाणार आहे.
मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी 1 वाजता प्रारंभ करून मोर्चा 4 पूर्वी संपवायचे नियोजन आहे. मोर्चाचा समारोप आझाद मैदानावर जाहीर सभेने होईल.
मोर्चासंदर्भात टीझर जारी
शिवसेनेने या मोर्चासंदर्भात टीझर जारी केला. हा मोर्चा नेमका कशासाठी असणार याचे आशयपूर्ण कथन त्यात करण्यात आले आहे. निर्धार मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील चुका सुधरवा नाहीतर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हा सर्वांना मिळून ठरवावे लागेल, असा इशारा निवडणूक आयोगाला दिला होता. त्याचा संदर्भ या टीझरमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय ‘लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतं. आताची परिस्थिती अशी आहे की सरकार मतदार निवडू लागलं आहे. लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला आम्ही मतदान करू देणार नाही. नाही म्हणजे नाही! मग काय वाटेल ते होऊदेत,’ अशा उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानेही टीझर अधिक प्रभावी झाला आहे.








