मुंबई,दि.8: शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी ईडीवर गंभीर आरोप केला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीकडून पक्षप्रवेशासाठी धमक्या देण्यात येत असल्याचा दावा संजय राऊत यांनी X वर पोस्ट करून केला आहे. राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी X वर म्हटले की, ‘शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे..येत्या काही दिवसात शिवसेना सोडा..पक्षांतर करा.. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे.हा एक प्रकारे दहशतवाद आहे.असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते. रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत. ते लढतील व जिंकतील. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत.’
अशातच ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकर यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याचीही माहिती आहे. वायकर यांच्यानंतर आणखी दोन आमदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आमदार रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणाले, ‘उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेचे कार्यकर्ते कंटाळले आहेत, अनेक जण शिंदे गटात येण्यास इच्छूक आहेत. धमक्यांना घाबरुन कोणीही शिंदे गटात येत नाही, ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून येत आहेत.’








