मुंबई,दि.३१: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी “राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील मुख्यमंत्री होऊ दे, संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येईन” असे म्हटले होते. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. समान किमान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे असं साकडं घातलं आहे. यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिय दिली आहे.
सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील लोकांसोबत चर्चा केली. सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचेदेखील दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं घातलं.
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देताना “मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
२५ वर्ष मुख्यमंत्री राहतील
“उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
राज्यसभा निवडणुकीवरुन संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “त्यांना या राज्यात घोडेबाजार करायचा आहे असं दिसत आहे. त्यांच्याकडे तेवढी मतं नाहीत, मतं असती तर त्यांनी नक्की संभाजीराजेंना उमेदवारी दिली असती. पण भाजपाने आधी संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचा, सहाव्या जागेसाठी उभं करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर वाऱ्यावर सोडलं. आता कोल्हापुरातून एका दूध आणि साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे. पण हा त्यांचा प्रश्न आहे”.