मुंबई,दि.२३: राज्यातील उदभवलेल्या परिस्थितीवर संजय राऊत (sanjay raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ मुख्यमंत्रीपद नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार असे म्हटले. त्यानंतर त्यांनी शासकीय निवासस्थान वर्षा सोडले. त्यानंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीपुढे मुख्यमत्री राजीनामा देणार का, आघाडी सरकारचे भवितव्य काय असेल यावर आपली भूमिका स्पष्ट केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार राऊत हे नेहमीपेक्षा अधिक आक्रमक दिसले.
ठाकरे मुख्यमंत्रीपदी राहतील
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दुखावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य केले असले, तरी मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नाही, तर जर विधिमंडळात मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला गेल्यास आम्हीच बहुमत सिद्ध करून दाखवू, असेही राऊत ठामपणे म्हणाले.
शरद पवारांनी असा सल्ला दिला नाही.
आघाडी सरकार वाचवायचे असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे असा सल्ला राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दाखवायला सुरुवात केली होती. मात्र या बातमीत काही तथ्य नसल्याचे खासदार राऊत यांनी सूचित केले. बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेला नाही, असे राऊत यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.