सोलापूर,दि.११: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र शेअर केले आहे. महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. अशातच सर्व विरोधी पक्षांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा लवकरच घोषीत होतील. जिल्हा परिषदा, नगरपालिका व राज्यांतील महानगर पालिकांचा यात समावेश आहे. अत्यंत महत्वाच्या असलेल्या या निवडणुकांच्या यंत्रणेवर आणि प्रकियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष पध्दतीने संविधानाचे पूर्ण पालन करून व्हाव्यात ही राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका आहे. सध्याच्या निवडणूक प्रकियेबाबत काही शंका नक्कीच आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी एक सर्वपक्षिय शिष्टमंडळ दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती खासदार राऊत यांनी एक्सवर पोस्ट करून दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून…
शिष्टमंडळात सहभागी होण्याबाबत शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना कळविले आहे व त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती देत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या शिष्टमंडळात सहभागी होण्याची विनंती केली. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. या शिष्टामंडळात आपण स्वतः सहभागी होऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा वाढवावी. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून लोकशाही बळकट व्हावी व निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावी हीच भावना आहे, असे या पत्रामध्ये राऊत यांनी म्हटले.
निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे. तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा. १४ ऑक्टोबर १२.३० वाजता राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. राज्याचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हावे अशी विनंती केली आहे. हे राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे! भेटी नंतर यशवंत राव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होईल, अशी माहिती राऊत यांनी एक्सवरील पोस्टमधून दिली.








