“भाजपाने कुठलीही एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावीच” संजय राऊत

0

सोलापूर,दि.11: आताच झालेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेट मतमोजणीत 150 मतदार संघात काँग्रेसला आघाडी होती. परंतु, ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी झाली तेव्हा काँग्रेस पिछाडीवर गेली. त्यामुळे बॅलेटपेपर आणि ईव्हीएम मशीन यांच्यातील ट्रेंड वेगळा असल्याचे स्पष्ट झाले. शेजारच्या बांगला देशातदेखील ईव्हीएमचा वापर होत नाही. त्यामुळे भाजपाने त्यांच्या सोयीनुसार आपल्या देशात कुठलीही एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावीच, असे खुले आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले.

रविवारी (दि.10) खासदार संजय राऊत हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका, भारतीय संविधान आणि लोकशाही, सोलापूरचे व महाराष्ट्राचे राजकीय चित्र यासह विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.   

चार राज्यात झालेल्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना खासदार राऊत म्हणाले, केसीआर हे तेलंगणा राज्याचे निर्मिते होते. त्यांचा पराभव भाजपाचे मोदी व शाह करू शकले नाहीत. तिथे भाजपला केवळ दहा जागा मिळाल्या. तो पराभव काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी करून दाखवला.

मध्यप्रदेशात मतमोजणीत पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत मध्य प्रदेशात सुमारे 150 पेक्षा अधिक मतदार संघात काँग्रेसला आघाडी मिळाल्याचे दिसून आले. बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशीन यात ट्रेंड वेगळा दिसून आला. त्यामुळे  देशातील कुठलीही एक निवडणूक मग ती भाजपशासित राज्यातील  असली तरी चालेल, ती  भाजपने बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, असे आव्हान राऊत यांनी यावेळी दिले. ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होऊ शकतो याचा शोध भाजपच्याच नेत्यांनी यापूर्वी लावला आहे.

त्यामुळे विरोधी पक्षांनी  या दहा वर्षात तब्बल 27 वेळा  बॅलेट पेपरद्वारे मतदान घ्यावे, अशी मागणी केली आहे. मात्र, मोदी व शाह असेपर्यंत लोकशाही संदर्भातली कोणतीही मागणी मान्य होणार नाही. हा निर्णय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय घेते. परंतु, या देशातील सर्व घटनात्मक संस्थांवर भाजप सरकारचा दबाव आणि नियंत्रण असल्याचे दिसून येते, अगदी मीडियापर्यंत ही हुकूमशाही पोहोचली आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी केला.

आरक्षणाबाबत संजय राऊत काय म्हणाले?

आर्थिक निकषावर आधारित आरक्षण दिले पाहिजे, ही यापूर्वीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती, तीच भूमिका आज आमची आहे. कुणाच्याही ताटातील काढून न घेता, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे, सरकारने याबाबत सकारात्मक विचार केला पाहिजे, अशी अपेक्षाही खासदार  राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली तर ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. त्यांनाच आज निवडणूक आयोग या पक्षाच्या स्थापनेबाबत प्रश्न विचारत असेल तर या निवडणूक आयोगाकडून कोणती अपेक्षा करावी, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सुडाचे व बदला घेण्याचे राजकारण

महाराष्ट्र राज्यातील  राजकारण हे राजकारण राहिले नाही. सुडाचे व बदला घेण्याचे राजकारण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीने असे राजकारण कधीही पाहिले नाही. गेल्या दहा वर्षात घाणेरडे राजकारण दिसून येत असून त्याची दशकपूर्ती झाली आहे. शिवसेना संपविण्याचा गेल्या 55 वर्षात अनेकांनी प्रयत्न केला. परंतु, ते कोणालाही शक्य झाले नाही. मोदी शाह संपतील पण शिवसेना संपणार नाही. देशात हुकूमशाही राजवट सुरू आहे. हुकूमशाहीची नोंद इतिहासात होत नाही. सत्तेत आहेत म्हणून त्यांचे सर्व काही चालले आहे, असेही खासदार राऊत म्हणाले.

सरकारने त्यापेक्षा बेरोजगारीवर बोलावे

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करेल का ? या विषयाच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलताना ते म्हणाले, राम मंदिर कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशातून गावोगावी ट्रेन सोडल्या जात आहेत. अक्षता वाटल्या जात आहेत. सरकारने त्यापेक्षा बेरोजगारीवर बोलावे. काश्मिरी पंडित यांची घर वापसी यावर बोलावे. देशाच्या विकासावर बोलावे. निवडणुकीच्या दरम्यान येणाऱ्या काळात गंभीर घटना घडतील का ? असे विचारले असता अशा घटनांशिवाय भाजपा निवडणुकीला सामोरे जाऊच शकत नाही. यापूर्वी पुलवामा प्रकरण कसे घडले ? राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जे स्पष्टीकरण दिले. त्यावर भाजपने उत्तर दिले का असाही सवाल  राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

ओबीसी व मराठा यांच्यात तेढ निर्माण केला जात आहे

सध्याचे एकूणच चित्र पाहता हिंदू-मुस्लिम या विषयाचे नाणे आता भाजपच्या दृष्टीने गुळगुळीत झाले आहे. त्यामुळे त्या पुढे जाऊन आता विविध जातींमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यांवरून संघर्ष निर्माण करण्याचा घाट त्यांच्याकडून घातला जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद वाढवून ओबीसी व मराठा यांच्यात तेढ निर्माण केला जात आहे. यामागे भाजप आहे. राज्यातील सामाजिक एकता संपविण्याचा प्रयत्न होत आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या काळात भाजप हा एक विचारधारा असलेला पक्ष होता. मात्र, सद्यस्थितीत भाजपा हा मोदी-शाह अशा टोळीचा एक पक्ष झाला असल्याची टीकाही राऊत यांनी यावेळी केली. असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

तसेच जगाचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोडवितात असे भाजपचे लोकच सांगतात. परंतु , देशातील बेरोजगारी, दहशतवादी हल्ले, काश्मिरी पंडितांची घरवापसी यासह विविध विषयांवर पंतप्रधान मोदी यांची काय भूमिका आली का असा सवालही यावेळी खासदार राऊत यांनी उपस्थित केला.यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, माजीमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, सोलापूर लोकसभा विभागाचे प्रमुख पुरुषोत्तम बरडे, उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हा प्रमुख अमर पाटील, प्रा. अजय दासरी, प्रताप चव्हाण आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विजयकुमार राजापुरे यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here