सोलापूर,दि.10: शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर सोलापुरात चप्पल फेकण्यात आली आहे. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील बाळे येथे रविवारी (दि. 10 डिसेंबर) सायंकाळी घडली. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत ही घटना घडल्यामुळे सोलापुरातील शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
चप्पलांनी भरलेली पिशवी संजय राऊत यांच्या गाडीवर फिरकावून संबंधितांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे. मात्र, त्यांनी नारायण राणे झिंदाबाद अशा घोषणा दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगण्याची चिन्हे आहेत.
संजय राऊत हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. दिवसभर शहरातील पक्षाचे कार्यक्रम आटोपून खासदार राऊत हे सोलापूरचे उपनगर असलेल्या बाळे येथे शिवसेनेचे माजी नगरसेवक तात्या भवर यांच्या हॉटेलचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. कार्यक्रमाला शिवसैनिकांनी गर्दी केली होती.
बाळे येथील हॉटेलचे उद्घाटन आणि भाषण करून खासदार राऊत हे सोलापूरच्या दिशेने येत होते. त्यावेळी उड्डाणपुलावरून अज्ञातांनी राऊत यांच्या गाडीवर चप्पलेने भरलेली पिशवी फेकली, त्यामुळे एकच खळबळ उडाली. राऊत यांची गाडी पुढे सोलापूकडे निघून गेली. शिवसैनिकांनी ती चप्पलेने भरलेली पिशवी तातडीने बाजूला केली.
राऊतांच्या गाडीवर चप्पला भरलेली पिशवी फेकल्यानंतर अज्ञातांनी घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, जाताना त्यांनी नारायण राणे झिंदाबाद अशा घोषणा दिल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, चप्पल फेकणाऱ्यांची ओळख पटू शकली नाही. कार्यक्रमाच्या आयोजकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले, त्यामुळे कार्यक्रम शांततेत पार पडला.