मुंबई,दि.7: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत उद्या पत्रकार परिषद घेत असल्याची माहिती दिली आहे. उद्या चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत कोणता गौप्यस्फोट करणार? कुणाचा आणि कोणता घोटाळा बाहेर काढणार? नेमकी कोणती माहिती समोर आणणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
संजय राऊत यांनी याआधीच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणखी एक मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं म्हटलं होतं. याच शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन ईडीचा सर्वात मोठा घोटाळा सर्वांसमोर उघड करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आता संजय राऊत थेट ईडीबाब नेमके कोणते गौप्यस्फोट करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
“ईडीच्या चौकशांची भीती घालून सर्वांच्या कुंडल्या हातात असल्याचं हे किरीट सोमय्या सांगतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याही कुंडल्या आमच्या हातात आहे आणि आम्ही आरोप सुरू केले तर एक दिवस असा नक्कीच येणार आहे की तुम्हाला या महाराष्ट्रातून तोंड काळ करून जावं लागेल”, असं संजय राऊत म्हणाले होते.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टी व किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपा शिवसेनेत जोरदार हल्लाबोल सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या गैरवापर व भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपाचे नेते आमने-सामने येत आहेत. दरम्यान, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आघाडी उघडली असून, ते सोमय्यांवर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करत आहेत.