मावळे असल्यानेच राजे असतात, शिवसेनेची मावळ्याला राज्यसभेची उमेदवारी: संजय राऊत

0

मुंबई,दि.२४: मावळे असल्यानेच राजे असतात, शिवसेनेची मावळ्याला राज्यसभेची उमेदवारी दिली असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या चर्चांना अखेर शिवसेनेने पूर्णविराम दिला आहे. शिवसेना छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी देणार की नाही यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना अखेर संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी अद्याप अधिकृत घोषणा करणं बाकी असल्याचंही सांगितलं. तसंच मावळे असल्यानेच राजे असतात असं सांगत अप्रत्यक्षपणे संभाजीराजेंना टोलाही लगावला. दुसऱ्या जागेसाठी आपलं नावही ठरलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

“संजय पवार यांचं नाव अंतिम झालं आहे. संजय पवार शिवसेनेचे मावळे असून उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि उमेदवार विजयी होतील”.

“कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्के मावळे असून मावळे असतात म्हणून राजे असतात. पक्षनेते, पदाधिकारी हे मावळ्यांच्या जोरावर उभे असतात,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालं असून आदर ठेवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “नक्कीच सन्मान ठेवत आहोत. त्यांच्या कुटुंबाविषयी, गादीविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कायम आदर आहे. त्यासाठीच तर आम्ही सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार व्हा असा प्रस्ताव ठेवला. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, अपक्ष लढायचं आहे आणि त्यासाठी ४२ मतांची गरज आहे. जर कोणाकडे ४२ मतं असतील तर तो राज्यसभेवर निवडून येऊ शकतो. संभाजीराजे अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे माहिती नाही. पण प्रस्ताव आला तेव्हा गादी, छत्रपतींच्या वंशजाचा सन्मान लक्षात घेता शिवसेना उमेदवारी देईल, पक्षात प्रवेश करा असं सांगितलं होतं”.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here