मुंबई,दि.१७: Saamana: “मुंबईतील ‘मुका’ प्रकरणातील मुख्य आरोपी राहिले बाजूला, उलट राजकीय विरोधकांवरच कारवाई केली जात आहे. पुन्हा सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांनासुद्धा कायद्याने शिक्षा व्हायला नको काय? कोणत्याही अश्लील कृतींमुळे समाजाला त्रास होत असेल तर तो भारतीय दंडसंहितेच्या कलम २९४ अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे. मुंबई पोलीस ॲक्ट कलम ११० नुसारदेखील हा गुन्हा आहे. मग राज्याच्या गृहमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून ‘मुका’ प्रकरणातले सत्य का शोधले नाही?,” असा सवाल दैनिक सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.
या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते | Saamana
या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे. ‘लाच’ देणे व घेणे यात गैर वाटत नाही, अशी महाराष्ट्राची प्रतिमा झाली आहे. त्यामुळेच हे राज्य भविष्यात संतसज्जनांचे राहील काय, असा प्रश्न पडतो. गौतम अदानी यांच्या भ्रष्टाचारावर, दरोडेखोरीवर महाराष्ट्राचे सरकार गप्प आहे. या राज्यात सध्या काहीही घडू शकते. कायद्याचे राज्य साफ कोसळले आहे. ते असेच कोसळत राहिले तर महाराष्ट्र कोसळेल व महाराष्ट्राच्या प्रतिमेस तडेच तडे जातील. त्यास सुरुवात झाली आहे, असा इशारा शिवसेनेने ( ठाकरे गट ) दिला आहे.
“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी रस्त्यांवर कांदा ओतून भाजप सरकारचा निषेध केला, पण नाकाने कांदे सोलण्याचे या सरकारचे काम सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यांत भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज उघड होऊनही उपमुख्यमंत्री फडणवीस फक्त ‘आधीच्या सरकारने काय केले?’ हीच रेकॉर्ड वाजवून गुळगुळीत करीत आहेत,” अशी टीका ठाकरे गटानं ‘सामना’ अग्रलेखातून केली आहे.
“कोकणातले आमदार राजन साळवी व त्यांच्या कुटुंबीयांचा सरकारने असाच छळ चालवला आहे. आमदार वैभव नाईक, नितीन देशमुख यांनाही ‘अॅण्टी करप्शन’च्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. हे सर्व लोक मिंधे गटात सामील झाले नाहीत. त्यांनी आपले इमान विकले नाही. त्याची शिक्षा त्यांना दिली जात आहे. आता यावर फडणवीस हे नाकाने कांदे सोलत सांगतील की, ‘कर नाही त्याला डर कशाला?’ श्रीमान फडणवीस तुमचे बरोबर आहे, पण ‘डर’ आम्हाला नसून तुमच्या लोकांना आहे व तुमच्याच संरक्षणाखाली भ्रष्टाचाराचे कुरण फुलले आहे. दौंडच्या भीमा पाटस साखर कारखान्याचा 500 कोटींचा घोटाळा समोर आला. शेतकऱ्यांचा पैसा भाजप आमदार कुल यांनी ‘हडप’ केला. त्या पैशांचा अपहार झाल्याचे उघड होऊनही फडणवीस हे आमदार कुल यांची वकिली करताना दिसतात,” असं टीकास्र ठाकरे गटानं सोडलं आहे.
“अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले. जरी अमृता फडणवीसांनी यासंदर्भात आता एफआयआर दाखल केला असला तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण हे प्रकरण गंभीर आहे. प्रश्न इतकाच आहे की, या प्रकरणातील जे कोणी लाच देण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्यांची हे करण्याची हिंमत झालीच कशी? म्हणजेच या राज्यात सर्वकाही पैशानेच साध्य होते व ‘लाच’ हाच परवलीचा शब्द झाला आहे,” असा घणाघात करत ठाकरे गटानं फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.