संजय राऊत यांना भेटलेला तो राष्ट्रवादीचा नेता कोण?

0

मुंबई,दि.२४: ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून मोठा दावा केला आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी समर्थक आमदारांसह थेट राज्य सरकारमध्ये सहभाग घेतला. आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आता शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली. त्यामुळे ठाकरे-पवार यांच्या राजकीय अस्तित्वालाच धक्का देण्याचे काम भाजपाने केल्याचे बोलले जाते. मात्र यात आता संजय राऊतांच्या एका हॉटेल बॉम्बमुळे राष्ट्रवादीचा तो नेता कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

संजय राऊतांनी रोखठोक सदरात मोठा दावा केला आहे. त्यात संजय राऊत म्हणतात की, बंगळुरूसाठी विमानतळाकडे जाताना एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या एका नेत्याची भेट झाली. त्यांनी सांगितले आम्ही एनडीए बैठकीसाठी दिल्लीला चाललोय तर आम्ही बंगळुरूत बैठकीला चाललोय असं मी त्यांना म्हटलं. त्यावर आता तिथे जाऊन काय साध्य होणार असा प्रश्न या नेत्याने केला. त्यावर राऊतांनी काय होणार? ते शेवटी जनता ठरवेल. मोदी ज्यांना स्वत:चे वैयक्तिक शत्रू समजतात त्या सगळ्या देशभक्त पक्षांचे ऐक्य व्हावे, त्यांचे नेते एकत्र राहावेत अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे. त्यांचा तुम्ही भ्रमनिरास केला आहात असं प्रत्युत्तर राऊतांनी दिले.

त्यावर राष्ट्रवादी नेता म्हणाला, विरोधी पक्षाचे ऐक्य कशासाठी? त्यावर राऊतांनी मोदी-शाहांचा पराभव करण्यासाठी म्हटलं. मग मोदींचा पराभव का करायचा? असा प्रश्न राष्ट्रवादी नेत्याने विचारला. त्यावर देशाची हुकुमशाही संपवून लोकशाही टिकवण्यासाठी, आज सत्तेचे संपत्तीचे, विकेंद्रीकरण पूर्णपणे संपले आहे. सत्ता आणि संपत्ती फक्त २-४ लोकांच्याच हाती एकवटली आहे. हे चित्र तुम्हाला पटते का? असा सवाल राऊतांनी केला. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याने चित्र चांगले नाही, पण आम्हाला चक्की पिसायला जायचं नाही. त्यामुळे मोदी हवेत असं उत्तर त्यांनी दिल्याचा खुलासा राऊतांनी केला.

दरम्यान, २०२४ ला मोदी जातील तेव्हा काय कराल? असा सवाल संजय राऊतांनी करताच ते खरेच जातील का? असा प्रश्न राष्ट्रवादी नेत्याने विचारला. संजय राऊतांनी हे संभाषण झाल्याचा दावा लेखात केला आहे. राष्ट्रवादी नेत्याच्या मनात दिल्लीच्या सत्तेविषयी भीती होती हे जाणवत आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. चक्की पिसिंगपासून वाचण्यासाठी जीव वाचवण्यासाठी तिथे गेलेत, त्याचा खुलासा तुम्हाला होईल असंही संजय राऊतांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं. मात्र संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार, राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्यासोबत त्यांचे संभाषण झाले अशी चर्चा आहे. कारण एनडीएच्या बैठकीत राष्ट्रवादीकडून केवळ २ नेते गेले होते. त्यात एक प्रफुल पटेल आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यामुळे या दोन पैकी कोणत्या नेत्यासोबत राऊतांचे बोलणे झाले हे आगामी काळात कळेलच.    


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here