संजय राऊत यांनी भाजपा नेते लालकृष्ण आडवाणींचा व्हिडिओ ट्विट करत देवेंद्र फडणवीसांना दिले उत्तर

0

मुंबई,दि.२: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जुना व्हिडिओ ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले आहे. भाजपाने बाबरीच्या मुद्यावरुन शिवसेनेला घेरलं आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदूत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीकेचा मारा केला. बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपाचे नेते होते असं यावेळी फडणवीस म्हणाले. दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा एक व्हिडीओ ट्वीट करत हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले

“मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो,” अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली.

“बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपचे नेते होते, असे त्यांनी सांगितले. परंतु ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत”, अशी टीका त्यांनी केली.

संजय राऊत यांनी ट्विट केला व्हिडिओ

संजय राऊत यांनी लालकृष्ण आडवाणींच्या एका मुलाखतीमधील ४३ सेकंदांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. २९ डिसेंबर २००० रोजी एनडीटीव्हीने ही मुलाखत घेतली होती.

यामध्ये लालकृष्ण आडवाणी सांगत आहेत की, “६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते तेव्हा त्यांना रोखण्यासाठी मी सर्वात प्रथम उमा भारती यांना पाठवलं होतं. परत आल्यानंतर त्यांनी घुमटावर चढलेले लोक मराठीत बोलत असून ऐकायला तयार नसल्याचं सांगितलं. म्हणून मी प्रमोद महाजन यांना पाठवलं. पण तेदेखील हतबल होऊन परत आले. मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना मला जाऊ द्या असं सांगितलं. पण त्यांनी जाऊ दिलं नाही”.

दरम्यान सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलतानाही संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिलं होतं. “बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती असं कोणी विचारत असेल तर त्यांनी त्यांच्याच पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारी यांना विचारावं. त्या काळातील सीबीआयचा अहवाल तपासा. सीबीआयने तपास केला आहे. सीबीआयाने केलेल्या तपासाची पानं आणि केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. शिवसेना कुठे आहे असं विचारणाऱ्या अज्ञानांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेल,” असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी फडणवीसांना दिलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here