मुंबई,दि.10: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑफरवर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिलेल्या ऑफरचीही चर्चा सुरू आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलं आहे. काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा आमच्यासोबत या अशी खुली ऑफर मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे.
याआधी देखील एका मुलाखतीमध्ये मोदींनी उद्धव ठाकरे अडचणीत असतील तर मदतीसाठी जाणारी पहिली व्यक्ती मी असेन असं म्हटलं होतं. त्यानंतर आता सोबत येण्याची ऑफर दिल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोदींची जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे कोणत्याही प्रकारचा स्वाभिमान बाजूला ठेऊन आणि राष्ट्रहिताचा बळी देऊन नरेंद्र मोदी यांच्यासारख्या बाजूला जातील कुणी याचा विचार स्वप्नातही करणार नाही. मोदींना समोर त्यांचा पराभव दिसतोय’, असं संजय राऊत म्हणाले.
या लटकत्या आत्म्यासोबत…
‘मोदी हा एक लटकता आत्मा आहे. इकडे तिकडे लटकत फिरतो आहे. या लटकत्या आत्म्यासोबत आमच्या महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधीही जाणार नाहीत, असं संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. मोदी यांनी कळत नाही ते कुठे लटकता आहेत. त्यांची वक्तव्य पहा आज एक, काल एक, उद्या एक, त्यांची प्रकृती बरी नसावी असं मला वाटतं. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची प्रकृती तपासावी, त्यांना उपचार आणि विश्रांतीची गरज आहे. म्हणून ते अशी विधानं करत आहेत, अशा शब्दात राऊत यांनी सुनावलं आहे.