मुंबई,दि.25: महाविकास आघाडीची बैठक संपली आहे. हॅीटेल ट्रायडेंटमध्ये बैठक घेण्यात आली होती. सकाळी 11 वाजता सुरू झालेली बैठक संध्याकाळी 7 वाजता संपली. बैठकीत अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी बैठकीत जागावाटप हे सुरळीत पार पडले आहे. पुन्हा 30 बैठक होणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेकडून संजय राऊत, विनायक राऊत, सीपीआयचे प्रतिनिधीही उपस्थित होते. 48 जागांवर चर्चा झाली असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
संजय राऊत म्हणाले, वंचित बहुजन आघाडीसोबत आमचा कालपासून संवाद सुरू आहे. आज सकाळीही निमंत्रण पाठवले. प्रकाश आंबेडकर आणि आमच्या नेत्यांशी चर्चा झाली. 30 तारखेला होणाऱ्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सहभागी होतील. वंचित बहुजन आघाडी हा मविआचा घटक पक्ष आहे आणि राहील. या देशातील लोकशाही टिकायला हवी. संविधानाची चीरफाड सुरू आहे ते वाचायला हवे. मोदींची एकाधिकारशाही सुरू आहे ती रोखायला हवी. ही भूमिका आमची आहे तशी प्रकाश आंबेडकरांचीही आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असं राऊतांनी स्पष्ट केले.
30 तारखेपर्यंत महाविकास आघाडीतील जागावाटपावर सर्वकाही निश्चित होईल. प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीची असेल. वंचितसह आम्ही तिन्हीही पक्ष एकत्रित काम करणार आहोत. महाराष्ट्रातील 48 जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजू शेट्टी यांच्यासोबतही आमची चर्चा झाली आहे. प्रत्येक घटक पक्षाच्या मागणीवर आमची चर्चा होईल असंही संजय राऊतांनी सांगितले.