मुंबई,दि.12: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत महिन्याला महिलांना 1500 रूपये दिले जातात. या योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्कम वाढ करण्याबाबत घोषणा केली होती. आता राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे.
आपल्याच टॅक्सच्या पैशातून लाडकी बहीण योजनेसाठी पैसे दिले जात आहेत. आता, दोन महिन्यानी आमचे सरकार येत आहे, तेव्हा या योजनेत आम्ही 3 हजार रुपये देणार आहोत, असा शब्द ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला. लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न आहेत. महागाईचे प्रश्न आहेत, मुले बेरोजगार आहेत, ते प्रश्न कोणी सोडवायचे, 1500 रुपये दिले म्हणून मत मिळतील, या भ्रमात हे सरकार आहे.
शिवसेना स्थापन करताना ज्यांचा जन्म झाला नाही, त्यांच्या हातात निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह ताब्यात दिले आहे. निवडणूक आयोग कुणाच्या तालावर चालते, हे जनतेला माहित असून घटनेच्या 10 व्या शेडूलप्रमाणे 24 तासात सरकार बदलायला हवे, मात्र असे होताना दिसत नाही, त्यामुळे येणार्या काळात या राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जो अपमान झाला आहे, त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे आणि नांदेड त्यात मागे राहणार नाही, अशा भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोग न्यायव्यवस्था यांच्यामार्फत न्याय मिळत नाही, पक्षाचा संस्थापक जिवंत आहे, पण पक्ष तुमचा नाही, अशी अवस्था राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची निवडणूक आयोगाने केली. पक्षाचा संस्थापक समोर बसला असताना तो पक्ष तुमचा नाही, हे निवडणूक आयोग समोर सांगत आहे, शिवसेना पक्ष ज्यावेळी स्थापन झाला त्यावेळी ज्यांचा जन्म झाला नाही, त्यांच्या ताब्यात शिवसेना नाव व पक्ष चिन्ह हे निवडणूक आयोग देते, हा सरासर झालेला अन्याय जनता ओळखून आहे. घटनेच्या दहा शेडूलप्रमाणे सरकार 24 तासात बदलायला हवे होते, मात्र आम्ही तीन वर्ष झाले न्यायालयात याबाबत संघर्ष करत आहोत, असेही ते म्हणाले.