मुंबई,दि.७: किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरणी पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर या व्हिडीओचा मुद्दा थेट विधीमंडळाच्या अधिवेशनात गाजला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी या व्हिडीओचा पेन ड्राईव्ह विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिला. मात्र, आता या प्रकरणी हा पत्रकार कमलेश सुतार, अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला. तसेच भांडाफोड झालेल्या महाराष्ट्रद्वेष्ट्या व्यक्तीची चौकशी करण्याऐवजी पत्रकारांवर गुन्हा दाखल होत असल्याचा आरोप केला. ते गुरुवारी (७ सप्टेंबर) पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “संपादक कमलेश सुतार हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी एका महाराष्ट्रद्वेष्ट्या, मराठी द्वेष्ट्या व्यक्तीचा भांडाफोड केला आणि मुखवटा फाडत सत्य समोर आणलं. त्या महाराष्ट्रद्वेष्ट्या, मराठीद्वेष्ट्या व्यक्तीची चौकशी करायचं सोडून कमलेश सुतार यांच्यावर आणि त्यांच्या चॅनलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
नागडंउघडं सत्य महाराष्ट्रातीलच नव्हे, तर…
“महाराष्ट्रातील आणखी एक ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांच्यावरही याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. खरंतर हे नागडंउघडं सत्य महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्वच पत्रकारांनी समोर आणलं. युट्युब चॅनलने हे प्रकरण समोर आणलं, वृत्तपत्रांनी त्यावर बातम्या दिल्या. मात्र, गुन्हा अनिल थत्ते, कमलेश सुतार आणि त्यांच्या चॅनलवर दाखल होत आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
टार्गेट किलिंग
संजय राऊत पुढे म्हणाले, “हे एक प्रकारचं ‘टार्गेट किलिंग’ आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्व पत्रकार संघटनांनी, ज्यांना नागरी स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी याचा धिक्कार आणि निषेध केला पाहिजे. ही हुकुमशाही आहे. यावर सरकारला जाब विचारला पाहिजे. सरकार कोणतीही चौकशी न करता अशाप्रकारे कुणालाही फासावर लटकवू शकत नाही.”
“सत्य सांगणं हे या महाराष्ट्रात गुन्हा झाला असेल, तर आमच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आहे. ज्यांनी न्याय आणि कायद्यासाठी लढा दिला त्या महाराष्ट्रातील महापुरुषांनी वरून हे पाहिलं, तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील,” असंही राऊतांनी नमूद केलं.