मुंबई,दि.२३: भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. क्रिडा मंत्रालयाने आशिया चषक 2025 मध्ये भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी दिली आहे. यावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निरपराध लोकांवर अमानुषपणे हल्ला केला होता.
धर्म विचारून अतिरेक्यांनी निरपराध लोकांचा जीव घेतला होता. यानंतर भारताने ‘ॲापरेशन सिंदूर’ राबवले आणि पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना विरोध दर्शवला आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट म्हणजे शहिदांचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा अपमान असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत पत्रात म्हणतात, पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू अजून थांबलेले नाही आणि तरीही पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दिला हे प्रत्येक देशवासीयासाठी वेदनादायक आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाच्या परवानगी शिवाय हे शक्य नाही.
पाकिस्तान विरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू आहे आणि तणाव कायम आहे असे आपण म्हणता, मग त्यांच्यासोबत क्रिकेट कसे काय खेळायचे? पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यात 26 महिलांचे कुंकू पुसले गेले, या माता-भगिनींच्या भावनांशी आपण खेळत आहात का? पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळला नाहीत तर व्यापार थांबवू अशी धमकी प्रे. ट्रम्प यांनी दिलीय का? असा सवाल राऊत यांनी केला.
रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही…
‘रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही’, असे आपण म्हणता, मग ‘रक्त आणि क्रिकेट’ एकत्र कसे चालेल? पाकिस्तान सोबत सामना म्हणजे मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी आणि ऑनलाइन जुगार. यात भाजपशी संबंधित अनेक लोक गुंतलेले आहेत. गुजरातमधील जय शहा सध्या क्रिकेटचा कारभार पाहत आहेत. मग यातून भाजपला मोठा आर्थिक फायदा होतो का? अशा एकामागून एक सवालाच्या फैरी राऊत यांनी झाडल्या.








