मुंबई,दि.१६: शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत जोरदार टीका केली आहे. राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यावरून राऊत यांनी टीका केली आहे. शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरवर राऊत यांनी जोरदार टीका केली. सत्ता आहे म्हणून ऑपरेशन. सत्ता नसेल तेव्हा अख्खं दुकान खाली होईल. असे संजय राऊत म्हणाले.
ईडी, सीबीआय दोन तासांसाठी आमच्या हातात द्या तेव्हा अमित शहाही मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. चंद्रशेखर बावनकुळेंसह सगळेच तेव्हा कलानगरच्या दारात दिसतील. त्यामुळे सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. आम्हीही सत्ता भोगली आहे. पण इतक्या विकृत पद्धतीने आणि सूड बुद्धीने सत्ता राबवली नाही, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला. ते रविवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे किंवा हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आयुष्यभर सत्तेची पदं दिली, वैभव दिले. त्यांच्याविषयी अशा प्रकारची वक्तव्य करणे हे नैतिकतेला धरून नाही. आज तुम्ही सत्तेवर आहात, उद्या नसाल हे लक्षात घ्या. कधीकाळी आपण सहकारी होतो. उद्धव ठाकरे तुमचे नेते होते. आपण त्यांच्यासोबत बसून तासन्तास बसून चर्चा केली आहे. आमदारकी, मंत्रीपदं मिळवलेली आहेत. विधानसभेत पराभूत झाल्यावर याच रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा विधान परिषदेवर पाठवले होते. ही कृतघ्नता राजकारणात नसेल तर माणुसकी शून्य आहे, असे राऊत म्हणाले.